Thursday, November 1, 2018

मोबाईल स्क्रीन

मोबाईलची स्क्रीन ही गोष्ट मला फार मजेशीर वाटते.... म्हणजे बघा मोबाईलची स्क्रीन तुम्ही आयुष्याच्या कोणत्या  टप्प्यात  आहात हे सांगून जाते...

बऱ्याचदा लिफ्ट मध्ये असताना, आजूबाजूला कोणी तरी फोन अनलॉक करत. आपलं लक्ष तो लाईट खेचून घेतो... त्या माणसाचा वॉलपेपर दिसतो....

आता माझे निरीक्षण

आपल्याला बऱ्याचदा कॉलेज मध्ये मोबाईल मिळतो. त्या वेळी आपला वॉलपेपर असतो. आपलाच एखादा हिरो सारखा दिसणारा फोटो.....

मग आपण प्रेमात पडतो किंवा पडत नाही... प्रेमात पडलो तर आपल्या वॉलपेपर ची जागा GF किंवा BF चा फोटो घेतो जो घरी जाताना बदलला जातो. नाहीच पडलो प्रेमात तर पहिली कंडिशन अजून ही चालूच असते...

मग लग्न होतं... त्याच मुलीबरोबर झालं, तर आता वॉलपेपरची जागा दोघांचा मिळून काढलेला एखादा छानसा फोटो घेतो... दुसरी बरोबर झाले तर पहिलीचे फोटो डिलीट असतात... आणि दुसरी बरोबरचे फोटो, वॉलपेपरला असतात... आणि हो हो नाहीच झालं लग्न, तर पहिली कंडिशन अजून ही चालूच असते....

बायको बरोबरचा फोटो जास्त दिवस टिकत नाही, कारण मग मुलं होतात.... मग वॉलपेपरची जागा एखादया गोंडस बाळानी घेतलेली असते.... ही फेज बरेच दिवस राहते...

मग आपण आजी आजोबा होतो आणि मुलाच्या फोटोजागी नातू किंवा नातं जागा घेते.....

शेवटी शेवटी मात्र ही जागा देवाचे फोटो घेतात....

बघा तुम्ही पण निरीक्षण करून......

-आलेख पाटणकर

टीप:
1.अर्थात हे माझे निरीक्षण आहे, हे चुकूपण शकते....

2. माझ्या मोबाईलवर माझाच फोटो आहे कारण मी स्वतःला अजून कॉलेजमधलाच समजतो....

Wednesday, August 29, 2018

शेवटी लहान मुलीच त्या

अगदी काल घडलेल्या दोन गोष्टी... म्हणजे गाभा एकच पण संदर्भ वेगळा...
आमच्या बिल्डिंगमध्ये एक फॅमिली आहे. त्यांना दोन मुली आहेत. पालक उच्च हुद्यावर आहेत. नोकरी जास्त महत्वाची असावी इतर गोष्टींन पेक्षा.. आता हे आम्हाला माहीत झालं. बिल्डिंग मधल्या इतर बायकांकडून...

तर झाले असे की नोकरीमुळे मुलींना वेळ देता येत नाही म्हणून मुलींना पाठवले जातेय बंगलोरला....
शेवटी लहान मुलीच त्या... त्यांना ही काही तरी भावना असतीलच... पण त्याचा जास्त विचार होत नसावा... त्याचे प्रत्यंतर मला काल लिफ्टमध्ये आले... मी ऑफिसला जाताना त्या दोन मुली आणि त्यांची आई बॅगासकट माझ्या लिफ्टमध्ये आल्या... बाहेर आजी उभी होती टाटा करायला... मुली हिरमुसलेल्या... आजी ने टाटा केला...
आई ने जरा मुलींन कडे बघून आणि खोटं हसून म्हणाली... "SAY BYE BYE TO NANI..."
मुली आजी कडे न पाहता बाय म्हणाल्या... अश्या वेळी मुलांना जे घडतंय, त्यातून बाहेर काढू शकतील असे देवदूत म्हणजे आजी आजोबा वाटत असतात... त्यात आजी ने पण टाटा केलाय म्हणजे सगळं संपले... मग लिफ्ट बंद झाली आणि होणारी गोष्ट टाळता येणारी शेवटची आशा पण अंधुक झाली....

मग आईने मुलींनकडे पाहिले आणि म्हणाली... "Why are you so nervous, you must be excited.. afterall it's new phase of your life"
त्या म्हणाल्या "YES WE ARE" आणि परत चेहरा शांत झाला.

मी असे नाही म्हणत जो विचार मी करतोय तो बरोबर आणि तिचे आई वडील चूक...अर्थात आयुष्यात प्रत्येक गोष्ट इमोशनली घेऊन चालत नाही. तर कधी कधी प्रॅक्टिकल पण विचार करावा लागतो....कदाचीत मी बाप झाल्यावर सगळ्याच गोष्टी इमोशनली घ्यायला लागलो असणार....

तिची आई जे सांगत होती ते बरोबर होत.. एका नवीन गोष्टीला सुरवात होती पण माणसाच्या स्वभावानुसार त्या बदलाला मुली मनापासून तयार नव्हत्या....

ह्याच विचारात मी बाहेर पडलो... आणि संध्याकाळी काम आटपून घरी आलो...
तर दुसरी एक मुलगी माझ्या लेका बरोबर खेळत होती...
मी लेकाशी खेळत होतो... ते बघून कदाचीत तिला तिच्या बाबांची आठवण झाली आणि ती धावत माझ्याकडे आली आणि म्हणाली "UNCLE I AM FEELING SAD TODAY"
मी म्हणालो "BUT WHY"
ती म्हणाली "MY DAD GONE TO BANGALORE FOR SOME WORK AND HE HAS BEEN THERE FROM LAST THREE MONTHS AND I AM MISSING HIM LOT"

मला ते नाते जाम क्युट वाटले... मी तिला म्हणालो "THEN YOU MUST BE CALLING HIM EVERYDAY RIGHT?"

ती म्हणाली "YES UNCLE, BUT THAT 20 MINUTES ARE NOT SUFFICIENT FOR ME"

माझ्या डोक्यात परत सकाळच्या मुली आल्या... त्यांना नसेल का येत आई बाबांची आठवण तिथे गेल्यावर.....

-आलेख पाटणक

Wednesday, November 15, 2017

Advertisement

थोडा मोठा पण एकदा नक्की वाचा.... 

जाहिरात कशी असावी तर ती लक्षात राहील अशी असावी... मला विचाराल तर मला मनला भिडणाऱ्या जाहिराती खूप आवडतात.. त्या लक्षात राहतात... 

सध्या टीव्ही वर एक जाहिरात येते.. सोनी मॅक्स 2 ची.. इतकी सुंदर जाहिरात आहे ती..... वडील आणि मुलाच्या नात्यामधली जाहिरात आहे ती.... 

एक मुलगा हॉस्पिटलमध्ये येतो... डॉक्टर त्याच्या हातात त्याच्या बाबांचे रिपोर्ट देतात आणि सांगतात I AM SORRY.... मुलाच्या डोळ्या समोर एकदम पुढे घडणारे चित्र सरकते... तो बाबांना ठेवलेल्या रुम मध्ये येतो...

एक वॉर्डबॉय त्याच्या बाबांची दाडी करत असतो.
तो मुलगा वस्तरा स्वतः हातात घेतो आणि बाबांची दाडी करायला लागतो...आता त्यांच्यात बॉलीवूड च्या चित्रपटाचे डायलॉग चालू होतात...

बाबा त्या वस्तराकडे बघून म्हणतात " ये बचो के खेलनेकी चीज नाही है... हात कट जाये तो खून आता है..."

मुलाला कळलेलं असते कि आता आपल्या बाबाना थोड्याच दिवसात देव म्हणजे तो पर्वतदिगार घेऊन जाणारे म्हणून तो बाबांकडे बघतो हसतो आणि म्हणतो
"ना तलवार कि धार से, ना गोलियो कि बौछार से
बंदा तो डरता है, तो उस पर्वतदिगार से"

आता बाबाना हि अंदाज आला असतो कि आपल्या स्टेज बद्दल मुलाला कळले आहे आणि तो उगाच आपल्याला बरं वाटावे म्हणून हसण्याचा आव आणतोय... तेव्हा बाबा म्हणतात...
"तुम जिस स्कुल में पडतो हो उस स्कुल के हम प्रिन्सिपल रेह चुके है"

मग मुलगा म्हणतो...
"आज तक तुम बोलते आये हो और मै सुनते आया हू... आज मै बोलुंगा और तुम सुनोगे... गर्दन उपर....."

आता बाबाला पूर्ण खात्री होते त्याच्या रिपोर्ट ची आणि तो डोळे मिटून म्हणतो....
"डॉन जखमी हुआ तो क्या हुआ फार भी डॉन है..."

आता मुलाच्या डोळ्यातून पाणी येते... ते त्याचे बाबा नीट कळतं ते मुलाकडे पाहून म्हणतात
"जिंदगी और मौत उपर वाले के हात में है जहाँपना... "

आणि मुलगा रडत रडत त्याच्या बाबाना मिठी मारतो..... त्या मिठीत जे प्रेम दिसत ते खूप काही सांगून जात...

आणि शेवटी सोनी मॅक्स चा नाव येत आणि टॅग लाईन येते कुछ फिल्मो का जादू कभी कम नही होता . #सोनीमॅक्स२ याद रहेगा "

जाहिरात मनाला एवढी टच करून जाते कि विचारू नका... विशेषतः मुलाचा आणि वडिलांचे नातेच वेगळे असते आणि ते इतके सुंदर दाखवले आहे...

मोठं होताना वडिलांचा तिरस्कार करणारा मुलगा... जेव्हा वडील जाणार आहेत हे कळते तेव्हा ते नाते किती हि वाईट असू देत.. तो मनातून कोलमडतोच.... आणि तेच जर नाते आधी पासून घट्ट असेल तर तो कोसळतो...
कोलमडणे आणि कोसळणे ह्यात बराच फरक आहे...
कोलमडणार माणूस थोड्यावेळाने उभा राहू शकतो पण कोसळलेल्या माणसाला उभे राहीला थोडा वेळ लागतो....

प्रत्येक फॅमिली मध्ये जर आई हि भिंत असेल तर वडील हे एक अदृश्य पिलर असतात..
त्याच्या बद्दल एखाद्या वेळेस त्यांच्या मुलाच्या मनात भाव दिसणार नाहीत पण त्यांच्या बदल त्यांच्या मुलाच्या मनात प्रेम आणि आदर हा असतोच..

-आलेख पाटणकर

वडिलांची किंमत आताच जाणून घ्या... नही तर ती व्यक्ती नसताना त्यांची कमी जाणवेल आणि मग पश्चाताप करण्या शिवाय हातात काही नसेल.

Friday, October 20, 2017

Indian

वेळ काढून वाचावा असा स्टेटस...
अगदी परवा घडलेला किस्सा...
परळ च्या फिनिक्स मॉल वरून टॅक्सी पकडली... रस्त्यात ट्रॅफिक होतं, अर्थात नेहमी प्रमाणे....
नशिबाने टॅक्सी ड्राइवर बोलका मिळाला.... बहुदा तो पण बराच वेळ भाड्याची वाट पाहत होता... त्या मुळे त्याला ही गप्पा मारायच्या होत्या ...
इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर तो म्हणाला "साहेब तुम्हाला वाटत का, की दिवाळी आलीये"
मी म्हणालो "म्हणजे"
त्याने बाहेर हात केला आणि म्हणाला "आम्ही लहान असताना दिवाळीच्या चार दिवस आधी फटाके लावायचो. दिवे तर एक आठवडा आधी पासून लावायचो... आम्ही राहायचो तो रस्ता छान लाईट ने चमकून निघायचा"
मी म्हणालो हो आता बरेच सण कमी झाले आहेत
तो म्हणाला "हे चांगलं नाहीये ना पण सर. सण हे कमी होता कामा नयेत... आणि दिवाळी सारखा मोठा सण तर बिलकुल कमी होता कामा नये...."
मी फक्त हम्म म्हणालो
तो म्हणाला "कोर्ट आणि बाकीचे पक्ष काय म्हणायचं ते म्हणू दे... लोककानी दिव्याच्या माळा तरी लावायला हव्यात"
परत माझ्या कडे उत्तर नव्हतं....
आता तुही म्हणाल ह्यात नवीन काय आहे...
तर ह्यात नवीन हे होत की तो ड्रायवर एक मुस्लिम होता.... आणि त्याला आपल्या सणाची काळजी होती......
तेव्हा मनात विचार आला.... दोन धर्मातली भांडणे ही फक्त ऑनलाइन किंवा एखाद्या पक्षाच्या नादात आल्यावरच होतात.... बाकी सगळी कडे सगळे एकत्रच आहेत
-आलेख पाटणकर

Monday, January 23, 2017

कधी कधी अबोला नात्यात जास्त प्रेम आणतो...

Chandrashekhar Gokhaleच्या कथा वाचून मी पण विचार केला कि आपण पण एक प्रयत्न करावा एक छोटी सी लाव स्टोरी लिहायचा... प्लिज गोड मानून घ्या... 

तो सकाळी त्याच्याच विचारात उठला.. डोक्यात असंख्य कामं चालू होती... त्याच विचारात त्याने ब्रश करून लॅपटॉप लावला... आणि काम करू लागला... तेवढ्यात तिथून ती आली.. तिच्या डोक्यातच नाही तर हातातून पण कामे होत होती... तिनी त्याच्या कडे पाहिले हि नाही आणि पटकन त्यालाएक काम सांगितले... त्याने लॅपटॉप च्या स्क्रीन वरून हळूच तिच्या कडे रागाने पाहत.. परत काम करायला लागला...

तिनी परत त्याला तेच काम सांगितले.. ह्याचा सकाळीच रागाचा भडका उडाला.. काही हि ना बोलता तो लॅपटॉप ची स्क्रीन आपटून कामाला लागला.... तिच्या दृष्टीने त्याचे काम महत्वाचे नव्हते... आणि त्याच्या दृष्टींनी तिचे काम...

तिथेच दोघांना मध्ये काही ना बोलता खटका उडाला.... आता तो हि गप्प आणि ती हि... तिनी ह्याच्या रोजच्या वागण्याचा, रागाने विचार करत कपाटाला एक ड्रेस खेचून काढला... आता नशीब म्हणा कि काय नेमका त्याने तिच्या साठी सिलेक्ट केलेलाच ड्रेस निघाला....

दोघे तयार होऊन ऑफिस ला निघाले

.... अबोला अजून हि कायम होता.... रागामुळे आपण कसे दिसतोय ह्या कडे पण तिचे लक्ष नव्हते... दोघे हि तसेच ऑफिसला गेले...

ऑफिस मधून आल्यावर एक गोष्ट दोघांनी सांभाळून ठेवलेली ती म्हणजे अबोला..

तो दिवस तसाच गेला.... "रात गई बात गई" ह्या हिशोबाने दोघे हि जागे झाले आणि आपापल्या कामाला लागले... ऑफिस तयारी चालू झाली म्हणजे एकंदरीत रुटीन तेच होते.... फरक फक्त इतकाच होता कि आता
अबोल्याची जागा शब्दांनी घेतली होती...

दोघे हि ऑफिस ला निघाले... ती मनात म्हणत आज काल ह्याचे लक्षच नसते माझ्या कडे...

तो हि बाईक वर बसताना हेल्मेट घालता घालता तो पटकन बोलला.. "काल ड्रेस मध्ये छान दिसत होतीस"..

मनात तो त्याच्या दोन्ही सिलेक्शन वर खुश होता ... ड्रेस आणि ती हे दोन्ही त्याचेच तर सिलेक्शन होते...

ती काही ना बोलता स्कुटर वर बसली आणि पुढे गेली... ह्याच्या मनात विचार आला कि हिला आज काल आपण काही चांगलं बोललो तर फरक पडतो का? कि हिचे आता प्रेम कमी झालेय...

हा विचार चालू असतानाच तिची स्कुटर थांबली.. त्याने स्कुटर च्या आरश्यातून पाहिले तर ती हसत होती... तिनी मागे वळून पाहिले आणि म्हणाली "काल ऑफिस मध्ये पण सगळे तेच म्हणाले कि आज छान दिसते आहेस"

तो मनात हसला बाईक च्या आरश्यात स्वतःलाच पाहून खुश होत होता.....

कधी कधी अबोला नात्यात जास्त प्रेम आणतो...


Friday, December 30, 2016

सिग्नल

खूपदा असे होते... एखादा प्रसंग घडतो, एखादा माणूस येतो पटकन काही तरी बोलून जातो.... आणि खूप काही तरी शिकवून जातो...
तेव्हा तुमचा वर्षांनो वर्षांचा अनुभव, तूमचे वय, तुमचा हुद्दा काही म्हणजे काही मॅटर नाही करत..... कारण आयुष्याचा पेपर हा प्रत्येकाचा वेगळा असतो... आणि त्याची उत्तर पण प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने देतो...
त्याचे झाले असे, माझ्या टीम मध्ये एक मुलगा जॉईन झाला(SK Ainuddin)... अनुभवाने, वयाने माझ्या पेक्षा कमी...
मागच्या आठवड्यात आम्हाला दोघांना एकदम तहान लागली म्हणून आम्ही पाणी प्यायला गेलो.
ऑफिस मध्ये वॉटर प्युरिफायर आहे... ज्याला दोन नळ आहेत...
मी विचार केला... ह्याची मजा करू... म्हणून मी तो पोहोचायच्या आधीच धावत जाऊन एका नळा खाली ग्लास धरला... त्यामुळे त्याला दुसऱ्या नळा खाली ग्लास धरावा लागला...
मी त्याच्या कडे बघून हसलो आणि म्हणालो "क्या हुआ SK..."
त्याने माझ्या कडे पाहिले आणि मी पाणी भरत असलेल्या नळा कडे पाहिले आणि तो हसला... ते पण गालात...
मी नळ चालू केला तर त्यातुन पाणीच येत नव्हते...
मी म्हणालो "ऐसा कैसे हुआ SK..."
तो म्हणाला "क्यूँके आपने पहले सिग्नल को देखा नही और उसे value नही दि..."
आणि त्याने नळाच्या वर असलेल्या 3 लाईट कडे बोट दाखवले... ते बंद होते.. म्हणजे मागे पॉवर च नव्हती मशीन ला...
मनात आले देव पण आयुष्यात बऱ्याच वेळा आपल्याला सिग्नल देतो... आपणच तो नो बघता आपला पेला भरायला जातो....
-आलेख पाटणकर

Monday, December 12, 2016

कसे बोलावे आणि कुठे

आपल्या इथे लोक्कांना काय बोलावे हे जसे कळत नाही तसे
कसे बोलावे आणि कुठे हे तर त्या हून कळत नाही....
मध्ये माझ्या एका मित्राच्या कृपेने हॉस्पिटलला जाणे झाले.... तिथे operation theater होते.मी फिरत फिरत तिथे गेलो.तर तिथे एका बाकड्यावर पेशंटचे नातेवाईक बसले होते.
तेवढ्यात एक wardboy एका बाईला operation साठी stretcher वरून घेऊन आला.मी तिथेच उभा होतो.
त्याने तिच्या नवरयाला हाक मारली. बाई अर्ध गुंगी मध्ये होती. कारण तिला कळत होते आजूबाजूला काय चाललय, कोण काय बोलतय. तसा ती प्रतिसाद पण देत होती. Operation पण छोटे होते.. ते गुंगीच्या प्रमाणावरून कळत होते.
तिचा नवरा तिथे आला. त्याने तिचा हात पकडला... तिच्या जवळ गेला आणि तिच्याशी बोलणार तेवढ्यात तो wordboy त्रस्त होउन म्हणाला...
"शेवटचे काही बोलायचं.....?" (त्याला म्हणायचे होते operation आधी काही बोलायचं... पण असो...)
ते ऐकून मी उडालोच... तिचा नवरा हि उडाला.... अर्ध गुंगीत असलेल्या बाईने आता पूर्ण डोळे उघडले होते...
आणि नवरयाने घट्ट पकडलेला हात आता आजूनच घट्ट झाला होता.....
-आलेख पाटणकर